कानपूरवर स्वारी
फार फार वर्षांपासून आम्ही संजय दादांची कीर्ती ऐकून आहोत. अगदी लहानपणा पासून फार हुषार म्हणून डंका वाजत होता. आता तसं म्हटलं तर आम्ही काय कमी हुशार होतो? तिसरीत असताना चित्रकलेच्या परीक्षेत आमचा दुसरा नंबर आला होता. झालंच तर सातवीत असतांना तिमाही परीक्षेत भूगोलात सबंध वर्गात आमचा तिसरा नंबर आला होता. पण आमचं कुण्णी कौतुक केलं नाही. जाऊ द्या झालं. तर काय, अशा या संजय दादाच्या IITK मध्ये जाण्याचं ठरलं तसं आम्हाला एकदम उत्साह आला. आमच्या दुधभाती जीवनामधली ही पंच पक्वांन्नाची चमचमीत मेजवानी आम्ही कशी बरं सोडणार ?
जायचं कधी हा प्रश्न होताच. कारण संजय दादा सारखी माणसं हिच काय ती कामाची माणसं. बाकी सगळी रिकाम टेकडीच. पण संजय दादानेच नीट बघून तारखा कळवल्या. लगेच रेल्वे-विमानाची तिकीटाची व्यवस्था झाली. बायका पण खायचं प्यायचं काय काय बरोबर घ्यायचं याच्या याद्या करू लागल्या. हा हा म्हणता जायचा दिवस उजाडला. सगळ्यांची वयं (आणि वजनं) अशी कि ट्रेन मध्ये चढणे, सामान लावणे, नीट पोचणे हे सुद्धा दिव्यंच. पण (बरोबर कोणी नवीन पिढीचे नसल्याने) सगळी जण सहजपणे चाळीस वर्ष मागं गेली. आणि मग हि सगळी तरुण माणसं ट्रीप खरी enjoy करू लागली. गाणी-गप्पा (म्हणजे गाण्यांच्या गप्पाच, या कान सेनांच्या पुढे कोण गाणी म्हणणार ?), खाणी-पिणी (फक्त चहाच बरं का!) यांची मैफल जमू लागली. तरुण मुलांना(!) भूक नेहमी लागणारच, नाही का? सर्वच सुगरीणींनी कष्टाने बरोबर आणलेले फटाफट फस्त करत, वाटेतल्या स्टेशन वरच्या सगळ्या फेरीवाल्यांना उदार आश्रय देत देत कानपूर आलं सुद्धा!
प्लॅटफॉर्मवर जेव्हा खुद्द डायरेक्टर सपत्नीक स्वागताला आलेले दिसले तेव्हाच आश्चर्याचे धक्के बसायला सुरुवात झाली. संजयदादा म्हणजे कायम बिझी. आपण जाऊ तेव्हा नेमकं त्याला काही काम निघून दिल्लीला जावं लागलं तर काय असा सर्वांच्याच मनातला प्रश्न निकालात निघाला (आणि खरं तर हायसं वाटलं). दादा आणि वहिनीच्या चेहऱ्यावरचा उत्फुल्ल आनंद सगळ्यांच्याच चेहऱ्यावर पसरला. खास मागवलेल्या गाड्यांमधून सर्व खाशा सवाऱ्या कानपूरच्या गर्दी-गर्दीच्या रस्त्यातनं, गाई म्हशींच्या मधून वाट काढत काढत IITK कडे निघाल्या. आणि संध्याकाळी बंगल्यावर येण्याच्या निरोपासह, एका छान गेस्ट हाउस मध्ये सर्वांची रवानगी झाली.
रात्रीच्या भोजनाच्या वेळच्या गप्पा जेवणा इतक्याच रुचकर होत्या. एका आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या श्रेष्ठ academician शी अशा शिळोप्याच्या गप्पा मारतांना सर्वांचा उर अत्यानंदाने भरून येत होता. आणि जेवण तर काय, सगळ्या सुगरीणींना सुद्धा तोंडात बोट घालायला लावणारे होते. कडाक्याच्या थंडीत हिरवळीवर आईस्क्रीम खातांना अनेकांना आपली वयं आठवली. उद्या नक्की काय कार्यक्रम ठेवला आहे याचा अंदाज घेत गेस्ट हाउस मधल्या रूम हीटर च्या उबेत कशी झक्क झोप लागली.
सकाळी सकाळी JK टेम्पल मधले श्रीकृष्णाचे भव्य आणि पवित्र दर्शन घेऊन “मिठास” मध्ये पाउल ठेवले आणि मग जी काही हात तोंडाची गाठ पडली ती केवळ अवर्णनीय. बिचारी अनेक दिवसांची उपाशी दिसताहेत असा त्या “मिठास” दुकानदाराचा गैरसमज झाला असला तर नवल नाही. आयुष्यात एकदाही जिलबीची चव सुद्धा घेण्यास नकार देणारे काही जण तिथली जिलबी पटापट मटकवतांना पाहून माणसं या वयात सुद्धा बदलू शकतात यावर कोणाचाही विश्वास बसेल. असा भरपेट नाश्ता खाल्ल्यावर खरं म्हणजे मस्त ताणून द्यायला पाहिजे होती. पण साहेबांचं फर्मान निघालं कि तयार रहा, आपल्याला आता `वर’ जायचं आहे. खरं म्हणजे वर जायची कुणालाच घाई नव्हती. (म्हणजे जायला तर लागणारच आहे , पण आजच कशाला? )
IITK मधल्या रस्त्यातून इकडून तिकडे करीत गाड्या थेट IIT च्या खाजगी विमानतळावर पोचल्या अन मग वर म्हणजे थोडंच वर, अगदी वर नाही याची खात्री पटली. या एवढ्या ग्रुपला पाहून पायलटला नक्कीच धडकी भरली असणार. पण एका छोट्याशा विमानातून भुरकन चक्कर मारतांना सब बच्चे लोग एकदम खुष झाले. कचाकच फोटो काढले गेले. एवढी वजनदार मुलं या छोट्याशा विमानाला पेलली, आणि सगळी सुखरूप उतरली सुद्धा. नंतर पायलट असं कुणाशी तरी म्हणत होता म्हणे कि आज पहिल्यांदाच अशी विमानाची (आणि पायलटच्या धैर्याची) टेस्ट झाली. या पायलटला राष्ट्रपती-पारितोषिक मिळायला हरकत नसावी.
सकाळचा नाश्ता खरं म्हणजे अजून उतरला नव्हता, पण तरी मेधा वहिनींच्या दही भाताला कुणी नाही म्हणू शकलं नाही. दुपारी भरल्या पोटी लगोलग गाड्या बिठूर कडे निघाल्या तेव्हा जरा नाही म्हटलं तरी डोळे पिंगुळले होते. पण जेंव्हा एकदम गंगा नदी समोर आली तेव्हा सगळे टुणकन गाडीतून उतरले. IITKचा डायरेक्टर गंगेवरच्या नावाड्यांशी घासाघीस करतांना फार म्हणजे फार मजा वाटत होती. त्या पवित्र गंगा नदीत शांतपणे नौका विहार करतांनाच सचिन तेंडूलकरची सेन्चुरी झाल्याची बातमी आली. वा! तो क्षण स्मृती-कॅमेरामध्ये कायमचाच पकडला गेला.
बिठूर म्हणजे पेशव्यांचं पराक्रम स्थान ! इथूनच १८५७ ची बंडाची सूत्र तात्यासाहेब टोपे आणि नानासाहेब पेशवे यांनी हलवली. तिथल्या उत्तर प्रदेश सरकारने एक सुरेख “नानासाहेब पेशवे स्मारक” बांधले आहे. महाराष्ट्रामधून आलेल्या या अस्सल मराठी माणसांनी त्याला भेट देणं क्रमप्राप्तच होते. मराठ्यांच्या या पराक्रमाची बूज उत्तर प्रदेश सरकारने ठेवली आहे, याची सर्व “राज”कारण्यांनी दखल घेतली पाहिजे. मराठ्यांच्या पराक्रमाची जी सुरुवात तिथून झाली त्याचेच अलीकडचे टोक म्हणजे IITK च्या डायरेक्टर पदी सुद्धा एका मराठी माणसाची नियुक्ती झाली आहे. (वा! वा! काय लॉजिक !) पण संजय दादा बिठूरला सगळ्यांना आवर्जून घेऊन गेला, यात त्याचा एक मराठी हेतू पण दिसून येत होता.
पण तिथे घडलेला एक प्रसंग अगदी मनाला स्पर्श करणारा होता. ब्रम्हावर्तावर पेशव्यांनी स्थापन केलेलं एक गणपतीचं मंदिर आहे. तिथे गेल्यावर सर्वांनी मिळून संजय दादासाठी अथर्व शीर्ष एका सुरात म्हटलं. गंगेच्या काठी मराठी मुलुखातून आलेली १५-२० चांगली सुशिक्षित दिसणारी माणसं एका सुरात खणखणीत आवाजात अथर्व शीर्ष म्हणताहेत हे दृश्यच अगदी विलक्षण होतं. तेथील एक प्रसन्नचित्त पुरोहित सुद्धा या आवर्तनात सहर्ष सहभागी झाल्याने त्या मंत्राचे सूर सर्वांच्या आत्म्यापर्यंत पोचले. Toast raisingचं हे एक अस्सल भारतीय रूप सर्वांनाच पाहायला मिळाले.

“बंगल्या”वर मात्र एका पार्टीची जय्यत तयारी दिसत होती. अनिल दादाच्या लग्नाचा, आणि संध्याचा ‘वाढ’दिवस त्याच दिवशी असल्याचं धांडे-युगुलाच्या चांगलंच लक्षात होतं. मग काय, केक, शाम्पेन वगैरे वगैरे अगदी थाटात झालं. पुन्हा एकदा एका अप्रतिम जेवणाचा लाभ सर्व खाद्य प्रेमींना झाला. उत्तर प्रदेशच्या भूमीवर आणखी एक मराठी झेंडा लावणाऱ्या एका दंपतीच्या पंगतीचा सहवासही पार्टीचा उत्साह वाढवणारा होता.
अशाच एका क्षणी संध्याने संजय दादांसाठी एक कविता सादर केली.
संजय दादास,
वैभव तुझे पाहून आम्ही सारे आनंदलो
डोंगराएवढ्या कर्तुत्वाने आम्ही सारे भारावलो ||
दोन्ही नानांचा हुशारीचा वारसा तू जाणीवपूर्वक जोपासलास,
"धांडे" नावाचा झेंडा जगभरात फडकावलास ||
"प्रो. संजय गो. धांडे" नावाची पाटी आम्ही कॅमेऱ्यात उतरवली,
तुझ्या बद्दलच्या अभिमानाने त्या आधीच उरात जागा पटकावली ||
हात तुझे आभाळाला टेकले तरी तू मात्र जमिनीवर,
तुझे नाते जगाला सांगून, आम्ही फुकटचे उंटावर ||
या तुझ्या यशोगाथेत मेधा वहिनीची साथ मोलाची,
कधीही मागे वळून पाहिलंस तरी उणीव न भासावी सावलीची ||
तुझ्या उत्कर्षाचा वटवृक्ष असाच सतत बहरत राहावा,
सुख समृद्धीच्या सदिच्छांचा हा पुष्पगुच्छ आमच्याकडून स्वीकारावा !!
नाना ग्रुप
इतक्या सुंदर भावना व्यक्त करणारी कविता ऐकून सर्वच भारावले, धांडे युगुल सुद्धा. उत्तर रात्री एका प्रसन्न वातावरणामध्ये दिवसाची सांगता झाली. बिठूर आणि ब्रम्हावर्तची ही आठवण दीर्घकाळ मनात रेंगाळणारी होती.
एक अती दुर्मिळ चित्र |
सर्व departments अगदी बारकाईने आणि जाणकाराच्या बेमालूम भूमिकेत सर्व जण बघत होते. संजय दादा सुद्धा हे आमचे जवळचे नातेवाईक आहेत असं सांगून आमचा ताण वाढवीत होते. आमच्या सर्व मूर्ख प्रश्नांना उत्तरं देतांना त्या अधिकारी आणि प्राध्यापकांची अवस्था “हेची फल काय मम तापाला” अशी झाली असणार. आमच्या पाठीमागे त्यांनी 'या चिखलात आपले डायरेक्टर-कमल कसे काय उगवले' असा एक परिसंवाद ठेवला असावा. पण अशा बालिश शंका सुद्धा विचारण्याचा चान्स परत कधीच मिळणार नसल्याने सर्वांनी आपली हौस भागवून घेतली. Nuclear physics, molecular bio-technology अशा प्रांतात सुद्धा सगळे जण आपली तलवार चालवत होते. “Fools rush in where angels fear to tread” याचा अर्थ त्या दिवशी खरा कळला असा संवाद कुठेतरी चालला होता.
कानपूर IITच्या सर्व विभागांना भेटी दिल्यावर व तेथील सर्व प्राध्यापक वर्गाला संजय दादा विषयी असलेला आदर पाहून सर्वांचे मन भरून आले. उगाच नाही या कानपूर IIT नाव जगात सगळीकडे झाले आहे. संजय दादाच्या केबिनमध्ये त्याचे खुर्चीत बसलेले फोटो काढतांना सर्वांची स्पर्धा चालली होती. तिथल्या एका फोटो गॅलरी मध्ये एक फोटो जरा भारीच होता. एका बाजूला बराक ओबामा, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मनमोहन सिंग, आणि मध्ये संजय धांडे ! वा ! गप्पा मारतांना सहज हातावर टाळी देणारा संजय दादा हा इथे विश्व नियन्त्रकांशी हसतमुखाने हस्तांदोलन करीत होता. त्या फोटोचे सुद्धा सगळ्यांनी धडाधड फोटो काढले. आला दिवस, गेला दिवस असे दिवस काढणाऱ्या आम्हा सर्व लोकांचे थेट ओबामा पर्यंत कसे तरी संबंध पोचल्याने मान अशी काही ताठ झाली कि विचारू नका.
![]() |
बराक ओबामा आणि संजय धांडे |
पुढच्या सर्व विभागांना भेट देतांना अर्थातच मान ताठ होती. अती उच्च तंत्रज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या या विद्यापिठाचे काम कसे चालते हे बघत असतांना काहींनी तिथल्या आर्कीटेक्चरचे फोटो काढले, काहींनी मोराचे तर काहींनी पक्ष्यांचे पण फोटो काढायला सुरुवात केली. इकडे तिकडे बागडणाऱ्या मोरांनी अनेकांच्या कॅमेऱ्यात भरपूर जागा पटकावली. पुरुष वर्ग तन्मयतेने फार समजतंय असा आव आणीत होते. पण समस्त स्त्रीवर्ग इथून शॉपिंग सेंटर किती लांब आहे याची चौकशी तिथल्या स्त्री शास्त्रज्ञांकडे करीत आहे असं कानावर आल्याने शेवटी हि IIT ची सफर आता संपली असं जाहीर करण्यात आलं.
दुपारच्या पुन्हा एकदा रुचकर आणि खमंग मेनूवर ताव मारल्यावर खरं म्हणजे झोपच हवी होती, अशी फक्त चर्चाच करायला पुरुषांना मोकळीक होती. सर्व बायका गाडीत आधीच जाऊन बसल्याने सगळे पुरुष मग खाटिकखान्याकडे जाणाऱ्या जनावरांशी सहनुभूती व्यक्त करीत मुकाट्याने गाडीत चढले. कारण आता कार्यक्रम शॉपिंगचा होता. संजय दादा आणि वहिनी कानपूरला पहिल्यांदाच या बाजारात आल्याचं कळलं तेव्हा हा मराठीच्या विद्वत्तापूर्ण साधेपणाचा झेंडा किती लांबवर फडकतो आहे ते कळलं. अर्थात कौतुक जास्त वहिनीचं ! पुरुष बिच्चारे नेहमी साधेच असतात.
कानपूरच्या चामडीच्या बाजारात आणि चीकनकारी (chicken curry नव्हे) च्या दुकानदारांना मराठी माणसे किती चिकाटीने घासाघीस करू शकतात याचे टोकाचे प्रात्यक्षिक देण्याचे काम इमानदारीने केल्यावर व खिसा (पतिराजांचा) हलका झाल्यावर मग नाईलाजाने गाड्या पुनश्च होस्टेलकडे वळाल्या. गाडी व मनं जड झाली होती.
वहिनींचा आनंदी चेहरा पहा. |
IITच्या या डायरेक्टरला आमच्या येण्याने व भन्नाट बडबडीमुळे किती त्रास झाला असेल. पण बिच्चारे दोघे जण तसं बिलकुल चेहऱ्यावर दाखवत नव्हते. ही सगळी ब्याद लवकर गेली तर बरं असं कुठलाही पुणेकर तोंडावर सुद्धा सांगू शकतो. पण लखनौ व कानपूरची आदब त्यांना असं करू देत नसावी. काही झालं तरी या उत्तर प्रदेशच्या भूमीत त्यांना येउनही तीसेक वर्ष झालीत.
सकाळी नाश्ता (म्हणजे तोच, भरगच्च जेवणासारखा) झाल्यावर एक खास फोटो काढण्यात आला. संजय दादाने सकाळीच दिल्ली कडे पळ काढल्याने मेधा वहिनीवर निरोप देण्याचं काम आलं होतं. चला, आता हे सगळे जाणार याचा आनंद लपवून दु:खाने निरोप घेणं अवघडच. मग विमान पकडून सगळे एकदाचे घरी सुखरूप आणि अखंड पोचले.
तिकडे कानपूरला डायरेक्टर च्या बंगल्यावर पुढचे तीन दिवस विद्युत रोषणाई केली गेली असं कानावर आलं.
No comments:
Post a Comment