Friday, March 29, 2013

माता न तू वैरिणी !

वर लिहिले आहे कि मजे मजेने वाचा .... पण हे लिखाण मात्र जरा गंभीरच आहे... मजा येईल...कदाचित राग येईल...पण वाचनीय जरूर आहे!


माता न तू वैरिणी ||
{आजच्या काळातील दुष्ट माता}

प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई||  
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”||
आई हा शब्दच जादूचा आहे. उदात्तते तुझे दुसरे नावच आई, इतकी आई या नावाची महती आहे. आणि तरी गदिमांनी गीत-रामायणात भरताच्या तोंडी आईला वैरिणी म्हणायचे धाडस केले आहे. खरं म्हणजे कैकयीने जे काही केले ते भरताच्या भल्यासाठीच ! पण तरीही तोच पुत्र तिला अशी दुषणे देत असल्याचे तिला ऐकावे लागले.

पण आजही या आपल्या समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत कि जी ऐकली कि खरंच प्रश्न पडतो कि हि माता आहे कि वैरीण ! या सर्व स्त्रिया काही खलनायिका नाहीत. पण या सर्व सत्य कहाण्या ऐकल्या कि मन सुन्न होतं.

माझ्या जवळच्या नात्यामध्ये एक स्त्री होती, तिला सत्ता गाजवायची भयंकर भूक होती. नवरा आणि मुलांवर तिने सतत अन्याय केला. तिचा एक मुलगा जरा वेगळा होता. त्याला अगदी लहानपणापासून नेहमी प्रश्न पडायचे.  “...तर काय होईल?” हे त्याचे पालुपद असायचे. तसं सगळ्याच मुलांना कुतूहल असतेच. पण याचे डोके नेहमी जरा तिरकेच चालायचे. “जेवलो नाही तर काय होईल? देवपूजा नाही केली तर काय होईल? शाळेत नाही गेलो तर काय होईल” असे त्याचे विचित्र प्रश्न ऐकून मजा वाटेल, पण राग येईल का? ते सुद्धा आईला? पण या आईला इतका राग यायचा कि ती फटाफट त्या ६-७ वर्षाच्या मुलाला कानफटात मारायची.

पण त्या मुलामधली जिज्ञासा काही कमी झाली नाही. उलट त्याला चेव येऊ लागला. मग काय, त्या आईचा त्या मुलावरचा राग वाढतच गेला, इतका कि मग त्याला चटके देणे, कोळशाचा चिमटा फेकून मारणे, उपाशी ठेवणे अशा शिक्षा सुरु झाल्या. तो मुलगा वेगळा आहे, त्याच्या कुतुहलामध्ये एक सर्जनशील संशोधक किंवा कलावंत लपला आहे हे काही केल्या त्या बाईला उमगले नाही. तिला तो एक उर्मट, उद्धट, बेशिस्त आणि उलट उत्तर देणारा वाह्यात मुलगाच दिसत होता. एकदा तर त्या बाईने (म्हणजे त्या मुलाच्या आईने) तर त्या मुलाला घरात जेवण्याची बंदीच घातली. कारण काय तर असेच काही तरी..! कि माझं ऐकत नाही! मला उलट उत्तर देतो वगैरे. पण शिक्षा मात्र भयंकर. आठवीतला तो पोर कुठे जेवील? आणि किती दिवस उपाशी राहील?

   दोन तीन दिवस उपाशी राहिल्यावर त्या बिचाऱ्याने शेवटी आपल्या हाताने स्वैपाक करायला सुरुवात केली. दुपारच्या सुट्टीत आई घरात नसतांना गुपचूप स्वैपाक करून तो तसाच म्हणजे कच्चा, बेचव वगैरे जेऊन घाईघाईत शाळेत जाउ लागला. आणि तसं तब्बल ३-४ आठवडे करीत राहिला. त्याचे वडीलही थोरच. थेट १५ दिवसांनी त्यांना हा असा पत्ता लागला. त्यांनी काय करावं? काही नाही. त्यांना त्या मुलाची कींवही आली नाही. तो मुलगाही भारीच. अशक्तपणा येऊ लागला तरी काही हरला नाही. शेवटी त्या बाईनेच माघार घेऊन त्याला जेवण्याचा “हुकुम” दिला.  

अर्थात या “बंडा”ची शिक्षाही त्या मुलाला अनेक वेळा मिळाली. त्याच्या इतर भावांना नवीन कपडे जेव्हा मिळत होते तेव्हा या मुलाला त्यांचे जुने कपडे मिळायचे. पुढे ते पण बंद झालं. अंगावरचे कपडे अगदी पार फाटले तेव्हा त्या मुलातला बंडखोर पुन्हा जागा झाला. त्याने मॅट्रीकच्या परीक्षेतले सर्व पेपर कोरे दिले. शाळेतून अर्थातच घरी लगेच कळाले. त्या मुलाच्या वडिलांना जेव्हा त्याचे कारण कळाले तेव्हा मग त्यांच्या लक्षात काहीतरी आले. कारण पुढचे काही दिवस जरा चांगले लक्ष दिले गेले.
पण थोड्याच दिवसांनी परत ये रे माझ्या मागल्या सुरु झालं. सोळा-सतरा वर्षाचा हा मुलगा घरातून पळून गेला. आणि पंधराएक दिवसांनी खिशातले पैसे संपल्याने मुकाट्याने घरात परत आला. पण त्याचा आनंद न त्याच्या आईला झाला, ना त्याच्या भावांना. त्याच्या आईची तर आली एक कटकट घरात अशीच प्रतिक्रिया झाली.
तो मुलगा हे सगळं कसं विसरू शकेल? त्या आई वडिलांच्या दुर्दैवाने त्यांच्या वृद्धापकाळात त्याच मुलाकडे आश्रय घ्यावा लागला, कारण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या चांगल्या व सरळ अशा त्यांच्या इतर मुलांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. कशी दैव गती आहे. आईच्या मायेऐवजी शिक्षेचे असे चटके बसल्यावर त्या मुलाच्या मनावर काय काय परिणाम झाले असतील, याची कुणाला काय फिकीर.  आपल्या मुलाच्या आयुष्याचे असे मातेरे करणारी ही माता कि वैरिण, ते तुम्हीच ठरवा.

दुसरे एक उदाहरण पण विलक्षण आहे. या दुसऱ्या माताजी शिस्तीच्या एकदम कडक. पोरांनी फक्त अभ्यास एके अभ्यास करावा, हि त्यांची इच्छा. अभ्यास केला नाही तर भयंकर शिक्षा केली जात असे. मुलांचे वडील प्रेमळ. पण या कजाग बाईपुढे त्यांचे काही चालत नसे. त्यांनी खटपटी करून आपली बदली करून घेऊन एकटेच लांब जाऊन राहू लागले. इकडे पोरांचं बालकांड चालूच. मुलं मुळातच हुशार असल्याने डॉक्टर-इंजिनिअर झाली. एक मुलगा परदेशात गेला तो तिकडेच स्थाईक झाला आणि आई वडिलांचे सगळे संबंध तोडून टाकले. दुसरा परदेशात शिकून भारतात आला पण एका लांबच्या शहरात जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करू लागला. तिथे त्याने नाव काढले. मुलांवर जरा माया केली असती तर पोरांनी आईचं असं नाव टाकलं नसतं. शिस्तसुद्धा मायेने लावायची असते हे तिला कधी कळलंच नाही. 

पण यातून ती काही शिकली तर आई कसली. दोन्ही मुलं लांब गेल्यावर धाकटी मुलगी फक्त राहिली. तिचे पण लग्न करून दिल्यावर आणि स्वतःच्या नवऱ्याचं निधन झाल्यावर ही बाई एकटी पडली. मग तिने तिच्या मुलीवर इतके “प्रेम” दाखवायला सुरुवात केली कि ती घटस्फोट घेऊन माहेरीच कायमची रहायला आली. अर्थातच तिचे पुन्हा लग्न तर झालेच नाही, पण पुढची २५ वर्ष आईची सेवा करत बसावे लागले. यात या “आई”ला काय मिळाले? तिने तिचे भवितव्य सुरक्षित केले पण त्या मुलीच्या आयुष्याचे काय?    

वयाबरोबर समज वाढते असं म्हणतात. पण या बाईंचा फक्त अहंकार वाढला. मुलांचा इतका दुस्वास त्या करू लागल्या कि त्यांचे नाव तर त्यांनी टाकलेच, पण आपल्या मुलीचे दोन विद्वान भाऊ पण हिरावून घेतले. एकदा मात्र फारच आजारी पडल्यावर मुकाट्याने मुलाच्या बंगल्यावर जाऊन राहिल्या. बरं वाटल्यावर परत दुरावा सुरु. आता तो इतका वाढला कि  त्या मुलाचा भारत सरकारतर्फे सर्वोच्च सन्मान झाला तरी त्याच्या कौतुकात ती काही सामील झाली नाही. आपल्या मुलांचे बालपण व आपल्या मुलीचे आयुष्य केवळ आपल्या अहंकारापायी उध्वस्त करण्याचे कार्य या बाईंनी केलं. हिला कोण माता म्हणेल?

आता हि तिसरी आई पहा. नवऱ्याचं व एकुलत्या एका मुलाचं अकाली निधन झाल्यावर तिने नातेवाईकांचा मिळत असलेला आधार न घेता आपली मनमानी सुरु केली. एका मुलीचं एका गरीब मुलाशी लग्न  लावून देऊन दुसऱ्या मुलीचं मात्र काही न काही खुसपट काढून लग्नच होऊ न दिलं. ती गरीब मुलगी आपल्या आईचा सांभाळ करीत राहिली. पुढे आपल्या आईसाठी तिला आपल्या आयुष्याचा आणि आपल्या आकान्क्षांचा कायमचा बळी द्यावा लागला. आपल्या मुलीच्या नोकरीच्या जीवावर ती पुढे ८७ वर्षे चांगली जगली. आईचा कट त्या मुलीच्या लक्षात आला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. पण नंतर ती आईला कधीच क्षमा करू शकली नाही. एखादी बाई निराधार होण्याच्या भीतीने अशी वागली असेल, असं समजून घेता येईल. तरीही प्रश्न उरतोच कि, आपल्या मुलीच्या आयुष्याचा बळी देणारी ही अशी कशी आई?

आता चवथे उदाहरण तर फारच भयंकर आहे. या बाईने आपल्याच मुलांमध्ये भांडणं लावली. एकाच्या कागाळ्या दुसऱ्याकडे, दुसऱ्याच्या तिसरीकडे. सरसकट थापा मारणे. सरासर खोटं बोलणे, हे सर्व प्रकार अगदी निर्लज्जपणे चालू ठेवले. मुलगा आणि सुनेबरोबर तर अगदी खालच्या थरावर जावून झोपडपट्टीतल्या लोकांप्रमाणे, कचा कचा भांडणं केली. आता असं अनेक ठिकाणी पहायला मिळते, यात काय विशेष असं वाटेल.

पण एव्ह्ढयावर कुठले भागले. नवऱ्याची परगावी बदली झाल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या मुलीकडेच ठिय्या देऊन बसल्या. साठीच्या आसपासचा तो गरीब नवरा बिचारा एकटा कुठेतरी लांबच्या खेड्यात जाऊन राहिला. नवरा आजारपणात मेल्यावर तर त्या अगदी मोकाट सुटल्या. पुढे पुढे आपल्या नातेवाइकान्च्या, अगदी मुलीच्या सासरी सुद्धा त्यांनी रोकड रकमेच्या, लहान सहान वस्तूंच्या चोऱ्या करायला सुरुवात केली. आपल्याच मुलांच्या नजरेतून त्या पूर्णपणे उतरून गेल्या. पाताळयंत्री, हेकेखोर आणि स्वार्थापायी कोणत्याही पातळीवर जाऊन दुराचार करणाऱ्या अतिशय बुद्धिमान आणि कवी मनाच्या या स्त्रीने आपल्या या विचित्र स्वभावाने माता या शब्दाला काजळी फासली. 

आता शेवटचे उदाहरण म्हणजे कहरच आहे. या बाई स्त्रीवादी आहेत. आपल्या अस्तित्वाविषयी अतिशय जागरूक आहेत. पुरुषांविषयी एक प्रकारचा द्वेष त्या सतत मनात बाळगून आहेत. इथपर्यंत त्यांना समजून घेता येतं. पण नवऱ्याने घेतलेल्या काही निर्णयामुळे त्या बाईंचा एव्हढा तोल गेला कि त्याचा राग आपल्या मुलांवर त्या काढू लागल्या. मुलीला पुरुषांचा द्वेष करण्याचे बाळकडू पाजू लागल्या. दुसरीकडे, सर्व पुरुषांवरचा राग त्या मुलांवर काढू लागल्या. मुलांना तर शिस्तीच्या नावाखाली इतके धाकात ठेवले कि त्या मुलांचा आत्मविश्वासच नाहीसा झाला. उठ म्हटला कि उठ आणि बस म्हटला कि बस, असे सुरु झालं. ती मुलं शिकली, नोकरी करू लागली तरी आईचा धाक इतका कि आईला विचारल्याशिवाय साधे पेनही खरेदी करू शकत नाहीत.

पण त्यापुढे जाऊन त्या बाई मुलांच्या मनात आपल्या पित्याविषयी त्या विखारी विचार पेरीत राहिल्या. लहान असेपर्यंत त्या मुलांच्या मनात वडिलांविषयी प्रेम वगैरे कधी रुजुच दिले नाही. पण मुले मोठी झाल्यावर कधीतरी मुलांना खरं काय ते शेवटी कळलेच. आणि मग आता त्या बाईंची अवस्था मुले तिरस्कार करताहेत, मुलगी लग्न करायचे नाव काढीत नाही आणि नवऱ्याचं घरात लक्ष नाही  अशी झाली आहे. आपल्याच मुलांच्या नजरेतून उतरण्याचे दुर्भाग्य या बाईंच्या वाट्याला आले. कुणाला अशा स्त्रीविषयी सहानुभूती वाटेल? कोण हिला “प्रेमस्वरूप आई” म्हणेल?

ही अर्थातच फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो कि या स्त्रियांना आपली नैसर्गिक आईची भूमिका बाजूला ठेवून असा कुलक्षणी विचार का करावासा वाटला?

या सगळ्या स्त्रियांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी चांगलीच होती. कुणाचं बालपण फार अवघड,  विचित्र वा विकृत वगैरे असं काहीच नव्हतं. मग हा त्यांच्या स्वभावातला विचित्रपणा आला कुठून? या सगळ्या आयांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे कि त्या दिसायला सर्व साधारण आहेत, कुणीच फार सुंदर वगैरे प्रकारात मोडत नाहीत. हल्ली प्रत्येकच स्त्रीला आपली स्वतःची ओळख वा स्वतंत्र अस्तित्व असावे वाटत असते. तशी या सर्व जणींना पण हि स्वाभिमानाची जाणीव आहेच. पण त्यामुळे या एकदम टोकाची अनाकलनीय भूमिका घेतील?

नाही पटत हे. मग काय कारण असेल?  

बिरबलाची माकडीण पण आपल्या पिल्लांचा बळी देऊन स्वतःचा जीव वाचविण्याची धडपड करते, हे सर्वांना माहीतच आहे. स्वतःचे अस्तित्व धोक्यात आले कि माकडीण काय, बाई काय पण कोणताही प्राणी असं विचित्र वागू लागतो. शेवटी स्वतःचा जीव वाचविण्याची नैसर्गिक प्रेरणा सगळ्यांमध्ये आहे.
आपले अस्तित्व धोक्यात आहे, असं या बायकांना वाटत असेल, तर त्यांचे वागणे विचित्र होऊ शकेल. पण मुळात या बायकांची लग्न झाली आहेत, एखादा अपवाद सोडला तर नवरा सुस्थितीमध्ये आहे, मुलं सगळी नीट शिकलेली आहेत. मग यांना अशी भीती का वाटावी?

असुरक्षितता ही केवळ मानसिक कल्पना आहे. भीतीपोटी एकदा  “आता माझं कसं होईल?” असा विचार सुरु झाला कि ती भीतीच पुढे स्वसरक्षणाची योजना आखायला लागते.

उदा: बहुतेक स्त्रियांना “माझा नवरा (हल्ली मित्र किंवा सखा/बॉयफ्रेण्ड) मला सोडून गेला तर?” हा विचार भयंकर सतावतो. आणि मग तो सोडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर ताबा वाढविण्याचा प्रयत्न सुरु होतो. हेच ते पझेसिव होणं. ही असुरक्षितता मग वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचा राक्षस होतो आणि मन नेमकं उलटा आणि नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो.
 
एक कॉलेजला जाणारा मुलगा होता. तसा तो हुशार होता. पण मुळातच जरा भित्रा होता. परिक्षा जवळ आली कि त्याची झोप उडायची. तशी सगळ्यांचीच उडते. पण याचं प्रकरण जरा वेगळंच होतं. अभ्यासाच्या ऐवजी कुठे चोरून प्रश्न पत्रिका मिळेल का, कॉपी कशी करता येईल असं सारखं याचं चाललेलं असायचं. त्यामुळे अभ्यास, झोप सोडून देऊन तो असा काही विचित्र वागायचा कि त्याची इतरांना कींव यायची. एरवी सरळ वागणारा मुलगा भीतीने शेवटी चोरासारखा वागतो याचं कारणच ही असुरक्षितता. ती त्याला माकड बनवायची.

या वरच्या पाचही आयांच्या उदाहरणांमध्ये हा एक असुरक्षिततेचा मुद्दा मात्र समान आहे. त्या सर्व स्त्रिया अतिशय बुद्धिमान आहेत. पण एकदा का या असुरक्षिततेने पछाडले कि त्या त्यांच्या बुद्धिमत्तेचा एकदम उलट्या मार्गाने उपयोग करू लागतात. आणि मग त्यांचं होतं माकड. एकदा का बुद्धी चुकीचा विचार करायला लागली कि मग प्रत्येक घटनेचा, प्रत्येक वाक्याचा उलटाच अर्थ काढला जातो. हे मन पण विचित्रच असतं. ते तुम्हाला कधी उंच आकाशात घेऊन जातं किंवा सागराच्या तळाशी पण.

जरा बुद्धी कमी असेल, तार्किकता कमी असेल तर भक्ती, श्रद्धा या मार्गाने त्या मनाला योग्य मार्गाने नेता येतं. पण अश्रद्ध माणसांचे मात्र हालच होतात. केवळ बुद्धीच्या सहाय्याने सतत सकारात्मक विचार करणे, सगळ्यांना जमतेच असं नाही.

या सर्व बायकांनी आपल्या नैसर्गिक प्रेम करण्याच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जाऊन आपले स्वतःचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यामुळेच त्यांना त्याचं काही चुकलं असं कधीच वाटले नाही. त्यांचा तथाकथित अहंकार हा सुद्धा त्यांचा एक प्रकारे स्वसंरक्षणाचा प्रयत्न असतो. आणि या प्रवृत्तीवर मात करणे फार कठीण असते. बुडत्याची वाचविणाऱ्याला घातलेली मिठी पण अशीच असते. आपण जे करतो आहोत त्यामुळे आपणच धोक्यात येत आहोत हि जाणीवच नसते. त्यात दुसऱ्याची पर्वा नसते. बस, मी वाचलो म्हणजे झालं, अशी भावना असते.

आणि नेमका हाच धोका बऱ्याच लोकांना ओळखता येत नाही. या असुरक्षिततेत अवाजवी महत्वाकांक्षा आणि सत्ता गाजविण्याची भूक जमा झाली कि चांगल्या माणसाचं होतं माकड. आणि मग होते एका चांगल्या मातेची वैरीण.  असं अर्थात मला वाटतं. ते चुकीचाही असू शकेल.

कैकयीने केवळ भरताचे म्हणजे आपल्या पुत्राचे हित पाहिले. यात तसे पाहिले तर काय चूक? जवळ जवळ प्रत्येक मातेच्या मनात हा विचार येतच असतो. पण सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून तिने रामाला १४ वर्षे वनवासाला पाठविले यात तिची दुष्ट बुद्धी दिसली आणि ही  आपल्या मुलावर अत्यंत प्रेम करणारी माता इतिहासामध्ये आणि लोकधारेमध्ये खलनायिका होऊन बसली.

वर दिलेल्या प्रत्येक उदाहरणामध्ये या स्त्रियांचे वर्तन तसे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे अप्पलपोटे आणि स्वकेंद्रित होते. तसे वर्तन आपल्या आजूबाजूला अनेक स्त्री-पुरुषांकडून घडत असते. मग याच स्त्रियांना लक्ष्य का? कारण आपण मातृत्वाला फार वरच्या पदावर नेऊन ठेवले आहे. म्हणून मग यांचं वर्तन खटकते. या “वात्सल्यसिंधू” मातेला सर्व सामान्यपणे जगण्याचा वागण्याचा हक्कच नाकारला जातोय. किंवा अशा “प्रेमस्वरूप” आया कमीच असतात. पण कवींनी त्यांचे फार उदात्तीकरण करून ठेवल्यामुळे उगाच सर्वच स्त्रियांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जात आहेत.

दुसरं म्हणजे अनेक माता या अशा सर्व सामान्य स्त्रिया असल्या तरी त्यांच्याविषयीच्या निगेटिव भावना त्यांच्या मुलांना व्यक्त करता येत नाही. आणि सर्व समाज हि ते समजून घेऊ शकत नाही. पण हे कोणीतरी बोललं पाहिजे.

अर्थात हे झालं माझं मत. तुमचं मत काय?        








 

No comments: