Tuesday, October 23, 2012

बायपासचे धड़े !!! भाग 2 My days of Bypass operation


बायपासचे धड़े !!!  भाग 2
(चाल: विंचुर्णीचे धडे)
उद्या काय होणार, या चिंतेने म्हणे बऱ्याच लोकांना ऑपरेशनच्या आदल्या दिवशी झोप येत नाही. मी पण एक झोपेची गोळी तयार ठेवली होती. पण कसचं काय, नाव विश्राम पडले ना! डोळे मिटले कि एकदम सकाळीच जाग. भूक आणि झोप यांचा दुष्काळ तर सोडाच जरा कमतरता सुद्धा कधी आयुष्यात पडली नाही तर आता कशी पडेल? सकाळी सकाळी एक नरसोबा (म्हणजे पुरुष नर्स) व्हील चेअर घेऊन आला, ऑपरेशनला घेऊन जायला. मी म्हटलं, अरे मला नीट चालता येतंय! पण छे. माझं काही एक न ऐकता माझी गाडी गाडी सुरू झाली. जाताना तो ढकल-बॉय सांगत होता कि लोक म्हणे ऑपरेशनला घाबरून पळून जातात, म्हणून ही  खबरदारी. ऑपरेशनला घाबरून डॉक्टर पळून गेल्याचं उदाहरण आहे का, असं विचारणं हेच चूक होतं हे त्या बॉय च्या चेहऱ्याकडे पाहूनच कळलं.

ऑपरेशन थिएटरच्या बाजूच्या रिकव्हरी रूम मध्ये बहुतेक माझीच वाट पहात होते. सगळ्यांनी अगदी घरी येणाऱ्या पाहुण्यासारखे स्वागत केले. तिथे चक्क खरोखरच्याच नर्सेस होत्या. माझी एव्हढी बडदास्त पाहून भरून आले. पण एक दुष्ट विचार मनात आला. (मन चिंती ते.....) यांना खरंच मनापासून आनंद झाला कि एक बकरा मिळाला म्हणून.....!!! छे. छे!! असा विचारसुद्धा आला नाही पाहिजे.  कालचाच भूलारी (म्हणजे अनेस्थेटीस्ट हो....) परत समोर उभा. माझ्याकडे ठेवणीतले व्यापारी स्मित फेकता फेकता मधेच डोक्याकडे पण पहात होता. म्हटलं झालं...आता तो आपलं डोकं पण उघडून बघणार. न्हाव्याच्या दुकानात गेल्यावर कसं तो कधी दाढीकडे तर कधी डोक्याकडे पहात असतो. मी अशावेळी घाईघाईने डोक्याकडे बोट दाखवी. हो, उगाच नसलेली दाढी करून परत पैसे उपटायला मोकळा. या भूलाऱ्याला मला सांगायचं होतं कि बाबा रे, माझी फक्त छातीच फाड. डोक्याला हात लावू नको. ते आता सुधारायच्या पलीकडे गेले आहे.

पण त्याच्या स्मित हास्याकडे बघता बघता मी फक्त छातीवर हात ठेवला. तोंडातून एकही शब्द न फुटल्याने मी  कसेबसे हसलो. त्याला वाटलं असावं कि फारच घाबरलो आहे. “अहो, घाबरू नका, साधे प्लंबिंग आहे हे. एक रक्त वाहिनी काढून तिचे दोन तुकडे करून इथून तिथून जोडायचे, कि झाले ऑपरेशन.” माझ्या डोळ्यासमोर आमच्या घरी नेहमी येणारा प्लंबर उभा राहिला. एकंदर सगळेच प्लंबर पैसे काढण्यात तरबेज असतात. आणि शिवाय त्यांनी प्लंबिंग केलेले नळ-जोड लगेच वर्षभरात गळायला लागतात. म्हणजे आता हृदयाच्या प्लंबिंगचे काही खरं नाही. वर्षभरात परत तिथून रक्त गळायला लागलं तर? माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न बघूनच तो भूलारी लगेच म्हणालाच कि अहो, ते बायो-प्लंबिंग असते. म्हणजे कधीच गळत नाही. हुश्श!

मग परत एकदा सगळं ठीक आहे हे बघून त्याने खूण केली आणि लगेच एका नर्सने दंडात मॉरफिन खुपसले. हा हा !! माझ्या त्या दिव्य प्रवासाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात सिनेमात दाखवतात त्या प्रमाणे सगळं धुसर दिसायला लागलं. मी डोळे मिटले. म्हटलं, आता हे शरीर तुमच्या स्वाधीन करतो आहे. जो कुछ प्लंबिंग करना है, कर डालो. सीन समाप्त.

जरा वेळाने जाग आली तर काय मी परत तिथेच. त्याचं बेडवर. आणि तीच नर्स व तोच नरसोबा समोर. अरेच्चा. ऑपरेशन कॅन्सल झाले कि काय. पण अंगावर एकही कपडा नव्हता (अंगावर चादर होती बरं) आणि छातीवर एक बँडेज होतं. यांव! ऑपरेशन झालेला दिसतंय. पण दुखत कसं नाहीये?

माझी हालचाल बघून एक सुंदर गोरी नर्स जवळ आली. (जरा पस्तीस-एक वर्ष उशिरा आली !! म्हणून धड धड वगैरे काही झाली नाही) “काका (अरे अरे); कसे आहात?”  मी म्हटलं, ‘अगं (पोरी) मला सांग माझा ऑपरेशन झालं कि काही गडबड झाली?’. आता हसण्याची पाळी तिची होती. पुढची पाच मिनिटे तिने सगळं ऑपरेशन काल कसं छान पार पडलं ते सांगितल्यावर माझी विकेटच गेली. म्हणजे कालपासून मी आपला झोपेतच किंवा गुंगीतच. काही म्हणजे काही सुद्धा आठवत नव्हतं. खरं म्हणजे आता “मैं कहां हुं” असं विचारायला हरकत नव्हती.  काही हवं का वगैरे विचारून ती समोरच तिच्या टेबलावर गेली. खरं म्हणजे खायला-प्यायला-हिंडायला बंदी असल्याने या प्रश्नाला तसा काही अर्थ नव्हता. जेंव्हा सगळं काही ठीक-ठाक असतं तेंव्हा असं का कुणी (म्हणजे नर्स वगैरे) विचारत नाही? असो. किती वेळा उसासे सोडणार? 

काल ऑपरेशन झाले, आणि आपल्याला काही म्हणजे काहीसुद्धा कसे आठवत नाही? असंच सगळ्यांचं होत असेल का? पलीकडे एक आजोबा सारखे कण्हत कुंठत होते. चवकशी केली तर कळलं कि त्यांचं पण बायपासचंच ऑपरेशन झालय ! मग मला का बरं काही दुखत नाही? असा विचार येत असतांनाच खोकला येऊ घातला. आणि मग कळलं छातीतलं दुःख काय असते ते. पुढचे दोन दिवस मी जरा तोंड उघडले कि सगळे नर्स-नरसोबा धावत येत आणि मग मला उठून बसव, जरा गप्पा मार असं करू लागले. पण मला मात्र बोलायला बंदी. चला. आयुष्यभर दुसऱ्या कुणाचे ऐकले नाही, स्वतःच सगळी बडबड केली. घ्या आता त्याची परतफेड.

संध्याकाळी मला चार पावलं टाकण्याची ऑर्डर मिळाली. दोन बाजूनी दोन नरसोबा शिवाय मागे पुढे वॉर्डबॉय अशी वरात सगळ्या रिकव्हरी वॉर्डभर फिरली. शिवाय जेवायला फुल थाळी आली. सलाईनही काढून टाकलं. मग वर्षां, विश्वासदादा, आणि कोणी कोणी भेटायला आले. मी जरा तोंड उघडताच लगेच मला गप्प बसण्याचा दम मिळाला. विश्वासदादाने तर त्या नर्सलाच सांगून टाकले, कि ‘याला बोलू देऊ नका. हा फार बडबड करतो’. याला म्हणतात तोंड दाबून बुक्क्यांचा मार.  पण काय करतो. मी असा त्यांच्या तावडीत पुन्हा पुन्हा थोडाच सापडणार होतो. करून घ्या चैन. एकदा बाहेर आलो कि बघतो.  म्हणजे हवं तेव्हढं बोलतो.

पण तिथली एक सय्यद नावाची नर्स (तीच ती, सुंदर गोरी) मात्र जणू माझ्या तैनातीलाच होती. तिची ड्युटी असेपर्यंत तिने माझी एव्हढी काळजी घेतली कि जणू एक मुलगी आपल्या पित्याचीच सेवा करीत आहे. मला अगदी बरं वाटतं आहे, पण वेळ जात नाही असं जाणवून खास वेळ काढून माझ्याशी गप्पा मारायला आली. मला पाणी पाजण्याची हिम्मत आयुष्यात प्रथमच कुणी केली असेल तर तिने. तिची ड्युटी संपल्यावर मात्र ती निर्लेपपणे निरोपही न घेता गेली. एव्हढ्या प्रेमळपणे आपलं कर्तव्य फक्त केरळीच करू शकतात हा माझा समज मात्र तिने खोटा ठरवला. परत कधी भेटेल ती? आता तेव्हढ्यासाठी परत बायपास म्हणजे फारच अवघड आणि महाग. नाही? पण दुसऱ्या दिवशी भेटेलच कि ती, अशी मी समजूत करून घेतली.  

दुसऱ्याच दिवशी ती कामावर यायच्या आधीच आमची रूममध्ये रवानगी झाली. पण या प्रेमळ आणि निरलसपणे काम करणाऱ्या कन्येला कसा विसरू?  
पुढे वाचत रहा........


      
      

Tuesday, October 16, 2012

My days of bypass operation


बायपासचे धड़े !!!
(चाल: विंचुर्णीचे धडे)
तुम्ही रस्त्याच्या कडेकडेने फुटपाथवरून नीट सरळ चालला आहात. आपल्याच नादात! रस्त्यावरची  रहदारी आपल्या गतीने चालली आहे. आणि एकदम एक गाडी आपला रस्ता सोडून सरळ तुम्हाला धडक देते. तुम्ही फेकले जाता. हात-पाय तुटतात. आणि तुम्ही रागाने आणि आश्चर्याने त्या गाडीकडे पाहता. हा कसा गाडी चालवतो गाढवासारखी. पण तुम्ही बाकी काही करू शकत नाही. कारण ती असते नियती. 

मीच कसा  सापडलो नियतीला?  

माझा एन्जिग्राफ़ीचा रिपोर्ट वाचतांना माझ्या इतकेच माझ्या फिजिशिअनलाही आश्चर्य वाटत होते. दररोज एक तास जिममध्ये घाम गाळणाऱ्या माणसाच्या हृदयातल्या रक्त वाहिन्या एवढ्या अरुंद झाल्याचे त्यांच्याही पाहण्यात नसावे. पण सत्य समोर वाकुल्या दाखवीत  उभे होते. बायपास शिवाय दुसरा कसलाच उपाय नाही असं सांगणं त्यांनाही जड जात होतं. ८०-८५च्या वयात करण्यापेक्षा साठीत बायपास करणं चांगलं असतं एव्हढाच काय तो दिलासा ते देऊ बघत होते.

म्हटलं चला, हाहि एक अनुभव गाठीला ! आतापर्यंत फक्त इतरांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले बघत आलो. आता आपणही बघू या कसं वाटतं, हॉस्पिटलच्या बेडवर झोपून. पण आपण आजारी आहोत हे खरं म्हणजे पटतच नव्हतं. कसं मस्तपैकी खाणं-पिणं-झोपणं (याला जीवन ऐसे नाव! J) चाललं होतं. ‘गुड-लक’च्या खिमा-पाव-चिकनची आणि बेडेकरांच्या मिसळीची आठवण येत होती. नाही म्हणायला फिरायला गेल्यावर किंवा जिम मध्ये गेल्यावर बरोबर १० मिनिटांनी थोडा दम लागायचा. पण त्याकडे दुर्लक्ष  केल्यावर पुढचे ३०-४० मिनिटे मस्त भरभर चालता येत होतं. उलट मस्त वाटायचे. पण आपले शरीर आपल्यापेक्षा यंत्रांना खरं काय ते सांगत असावे.

मोहनरावांचा (तेच ते संध्याचेहे’ ) एक भारी सिद्धांत आहे. त्याचं म्हणणं, कि डॉक्टरांनी तुम्हाला दुसऱ्याचाच एन्जिओग्राफीचा रिपोर्ट दाखवून गंडवलं आहे. २-३ लाखांसाठी आजकालचे डॉक्टर्स काहीही करतील. कुणाचाही अगदी माझाही विश्वास बसेल अशीच ही गोष्ट आहे. पण दुर्दैवाने माझी  एन्जिओग्राफी चालू असतांना डॉक्टरांनी मला ती पडद्यावर समोरच दाखवली असल्याने मी हा सिद्धांत  स्वीकारू शकत नव्हतो. पण त्यात एक गम्मतही होती. माझ्यापेक्षा इतर सर्वांनाच मला हृदयाचा काही  गंभीर रोग झाला आहे, हे पटत नव्हतं किंवा विश्वास बसत नव्हता. मला बरं वाटावं म्हणूनही कदाचित अशा शंका काढल्या जात असतील. { चला, मला बरं वाटावं असं लोकांना वाटतं हेही काही कमी नाही.}

आता एकदा “कार्य” करायचं ठरल्यावर भटजी पण शोधणे  प्राप्त  झालं.   {आमच्याकडे झालेच “कार्य” तर एव्हढेच होऊ शकते, असा विश्वास सर्व आप्त-मित्रांना  आहे.}   दोन-तीन नावांचा शोध घेतल्यावर सर्वानुमते एका नावावर एकमत झाले.  डॉ. जगताप  यांचा बायपास करण्यात हातखंडा आहे असं कळलं. {माझ्या डोळ्यासमोर धडाधड जिलबी पडणारा आचारीच उभा राहिला.  आला पेशंट, कर बायपास. आला पेशंट, कर बायपास. आणि मग शेवटी कपाळावरून घाम झटकून  हात पंचाला पुसून, घरी  जाणारा डॉक्टर (आपलं... आचारी) कसा दिसत असेल? }  नंतर कळलं कि ते खरंच दिवसाला ९-९ बायपास पाडतात, म्हणजे करतात.  

मग आता एव्हढ्या बिझी माणसाला गाठणार कसे आणि त्याच्याकडे महिनाभर वेळच नसला तर काय असे प्रश्न पडू लागले. आणि मग एकदम संध्याला (तीच ती  मोहनरावांची ही')  आठवलं कि डॉ. सुहास हरदास घोलपांच्या घरचेच आहेत. ते नक्की मदत करतील. लगेच डॉ. भरत घोलप (त्यांना दहा पोरं  होऊ दे!) यांना मध्ये घालून आम्ही डॉ. हरदासांच्या दरबारात हजर. त्या मस्त माणसाने (त्यांना पण दहा पोरं होऊ दे!) आमचा प्रश्न अक्षरशः एका मिनीटात सोडवला. धडाधड फोनवर बायपासची तारीख, भटजी (म्ह. डॉ. जगताप), मंगल कार्यालय (म्ह. सहयाद्री हॉस्पिटल), मुहूर्त वगैरे सगळं ठरवून वर अजून काय पाहिजे असं विचारलं.  आम्ही पार गार!!! डॉ. भरत घोलपांची काय वट आहे, एव्हढाच विचार सारखा येत होता. शिवाय पैसे पण घेतले नाही, म्हणजे केव्हढी वट बघा.

सह्याद्री हॉस्पिटल विषयी एका सर्जनने फार चांगले मत दिले नाही, म्हणून मग बाकीच्या हॉस्पिटलचा पण शोध सुरु झाला. आपला विश्वास दादा सह्याद्रीमध्ये वर्षभर उपचार घेत होता  म्हणून त्यालाच विचारलं तर त्याने एकदम चांगले मत दिलंच, शिवाय सह्याद्रीचा अगदी आग्रह धरला. खरं म्हणजे माझ्याच दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची  ऑपरेशन सह्याद्री मधेच झाली होती आणि माझं हॉस्पिटल विषयी चांगलंच मत झालं होतं. त्यांची ओपीडी म्हणजे मच्छी बाजार वाटतो. पण एकदा का तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झाला कि तुम्ही व्हीआयपी बनता. तिथल्या नर्सेस (बहुसंख्य नर्सेस चांगले बापडे म्हणजे ब्रदर्स आहेत, गैरसमज नसावा) तर अगदी प्रेमळपणे वागविणारे/ऱ्या होते/त्या. त्यांचे अगत्य पण अगदी पंचतारांकित होते; अगदी घरी जातांना थोडे वाईट वाटावे इतके. 

पण बायपास म्हणजे वेगळीच गोष्ट आहे, नाही का

हॉस्पिटलमध्ये सहज फोन केला तर कळलं कि तिथे रोज दोन दोन बायपास होतात. म्हणजे महिन्याला जवळ जवळ ५०! वा! म्हणजे माझ्यासारखे शेकडो लोक आहेत तर. मग काय झालंच तर. आणि एव्हढी ऑपरेशन्स तिथे होतात म्हणजे आपल्यावर प्रयोग-बियोग काही होणार नाही. सगळ्यांचे हात (किंवा डोके) तय्यार झाले असतील. ऑपरेशन डोळे झाकून करत नसले म्हणजे मिळवलं.  

शेवटी एकदाच्या सर्व शंका संपल्या. पैशाचा विचार झाला. इंडस  कार्ड  असल्याने तशी फार चिंता नव्हतीच. पण नीट चौकशी आधीच केली असलेली बरंच नाही का? सगळं काही नीट जमून येत आल्यावर आता फक्त हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचीच वाट होती. लागलीच नेहमीच्या धान्दलीने फेसबुक वर सगळं टाकायचा विचार होता. पण मग विचार केला कि आत्ताच कशाला टाका? जगलो वाचलो तर टाकू. उगीच कशाला आत्ताच कष्ट करा. (काय हा आळशीपणा !)

हॉस्पिटलमध्ये एकदाचा दाखल होण्याचा दिवस आला. सकाळी ९ वा. आधी सांगितल्याप्रमाणे पोचलो तर काय? कार्डीयोलॉजी विभागात येणारा मीच पहिला होतो. बहुतेक मलाच उत्साह फार असावा. किंवा सगळ्यांना मी येण्याची बातमी कळल्यामुळे सगळेच हॉस्पिटलमध्ये येण्यास कां-कु करत असावेत. कोणाला ही बला हवी असेल? पण तेव्हढ्यात एक डोक्यावर सगळीकडे दुपट्टा गुंडाळून एक तरुणी (बहुतेक तरुणीच) विभागात घुसली. त्या दहशतवादी कपड्यांच्या मागे चक्क एक डॉक्टर होती. माझी जुजबी चौकशी करून माझ्या हातात एक लांबलचक यादी ठेवली, आणि मला कटवलं. मी आपला वाट पहात होतो कि एक छान दिसणारी नर्स येईल, गोड गोड हसत मला माझ्या रूम कडे घेऊन जाईल! (बस! तेव्हढंच! शॉट कट!!) कसचं काय नी कसचं काय.    

आम्ही आपले ती यादी घेऊन मुकाटपणे (अगदी बें बें सुद्धा न करता) पॅथोलॉजी विभागात शिरलो आणि आपले सर्व अवयव त्या त्या मशीनच्या ताब्यात देऊ लागलो. हृदय पहिले, ते ठीक सापडले. (सापडले हे नशिबच, असं कोण म्हणालं?) ठीक म्हणजे ऑपरेशनच्या वेळी दगा देणार नाही, असे. मग बाकीचे सगळे अवयव तपासून घेतले, पण ते सगळेच अवयव ठीकच होते. फुफ्फुसं तपासणारी बाई (बाई कसली, १९-२० वर्षाची बेबीच होती)  तर अगदी निराशेने म्हणाली कि “याच्यात पण काही सापडले नाही, जा तुम्ही आता.” म्हणजे याचा अर्थ काय? काही सापडले तर यांना आनंद झाला असता कि काय? काय पण लोकांच्या अपेक्षा असतात कळत नाही.    

दिवसभर चालणाऱ्या या रहाटगाडग्यात एक मात्र चांगली गोष्ट होती. भूक बिक लागली कि जवळच बिपिनचं मस्त मस्त बटाटेवडे, इडली, उपमा इ.चेदुकान होतं. आता त्यामुळेच मला सारखी भूक लागत होती, असा आरोप माझ्यावर झाला, पण मी तो मनावर व पोटावर घेतला नाही. शेवटी बिपिनला पण पोट आहे, त्याला पण बायका-पोरं आहेत, (सॉरी, एकच बायको), त्याचा विचार आपण नाही करायचा तर कोणी करायचा? बिपिनच्या शेजारी अजूनही दुकानं होती. पण आपली निष्ठा फक्त बिपिनशीच.

सगळीकडचे रिपोर्ट घेऊन परत त्या दहशतवादी बुरख्याकडे गेलो. आता तरी ती नर्स येईल आणि....पण झालं उलटच. “तुमची रूम अजून रिकामी झाली नसल्याने तुम्ही तात्पुरत्या वॉर्डात जा” असा हुकुम पदरात पडला. मला हॉटेलमध्ये आलो आहोत कि काय असं वाटायला लागलं. पण काय करतो आता? मुकाटपणे त्या तात्पुरत्या वॉर्डात जाऊन पडलो. इथे जास्त करून डोळ्यांच्या ऑपरेशनचे पेशंट होते. म्हणजे ते सकाळी येतात आणि दुपारी किवा संध्याकाळी घरी जातात. काय काय तऱ्हेचे लोक होते तिथे. त्यांची मजा बघत बघत वेळ आपला चांगला चालला होता.

शिवाय माझं मनोरंजन करायला विश्वासदादा, संध्या, वैशाली अशा अनेकांची रांग लागली. मला रूम लवकर मिळावी अशी प्रार्थना माझ्यापेक्षा त्यांनीच जोरात करायला सुरुवात केली. मधेच एक डॉक्टर-बाई माझा धीर वाढवण्यासाठी आली. माझं खिदळणं बघून “अहो हे बायपास ऑपरेशन आहे, जरा सिरीयसली घ्या” असं बिचारीला सांगावं लागलं. एक भूल तज्ञ येऊन माझं बौद्धिक घेऊन गेले. सगळं ऑपरेशन कसं होणार याची कल्पना देण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला. माझ्या मात्र ऑपरेशनच्या आधी मला मॉरफिनचं इंजेक्शन देणार असल्याचं तेव्हढं लक्षात राहिलं. बस. ये बात हुई न! एकदा गुंगी द्या आणि मग खुशाल हवी ती चिरफाड करा.

आता संपूर्ण छाती फाडून हृदयाची रक्तवाहिनी बदलायचं ऑपरेशन म्हणजे तसं अवघडच. त्याचं वर्णन ऐकून तिथे हजर असलेल्यांचीच धडकी भरली. पण एकाने एक मुद्दा काढला कि हनुमानाने आपली छाती फाडली तेव्हा तिथे राम भगवान दिसले होते (म्हणतात). पण आता माझ्या छातीमध्ये कोण दिसणार? भर्रकन लहानपणापासून ह्रदयात साठून ठेवलेल्या अनेक छब्या आठवल्या आणि छातीत धस्स झालं. मी हळूच त्या डॉक्टरांना बाजूला घेऊन सांगितलं कि प्लीज माझी सगळी रहस्य माझ्या पोटातच (म्हणजे हृदयातच) ठेवा. बायकोला तर अजिबात सांगू नका. उगाच उरल्या-सुरल्या संसारात मिठाचा खडा नको. ते डॉक्टर माझ्या डोक्याकडे गंभीर चेहेऱ्याने पाहू लागले. बहुतेक याचं डोक्याचं पण ऑपरेशन करावं लागेल असा त्यांच्या चेहऱ्यावर भाव होता.

मग एकदाची स्वारीची रवानगी रूममध्ये झाली. मध्ये पडदा घालून दोन पेशंटची एकाच रूम मध्ये सोय केलेल्या त्या रुममध्ये पलीकडे एक पेशंट डिस्चार्जची वाट पहात होता. फोनवर त्या पेशंटची सगळी कहाणी अनेकांना त्याच्या बायकोने अनेकदा सांगितल्यामुळे आम्हाला पण ती तोंडपाठ झाली. अश्या किमान तीन पेशंटच्या कहाण्या पुढे पाठ होणार होत्या. शेवटी एकदाचा तो पेशंट आनंदाने (आमच्यापण) गेल्याने सगळी रूम आमच्या बापाची असल्याचा भास होऊ लागला. पण एकदा रूम ओस पडल्याने एकदम जाणवलं कि आता आपले उद्या ऑपरेशन. ते पण बायपासचे. सगळ्या सर्जरीमध्ये असलेली एकदम बाप सर्जरी. याला म्हणतात नशीब. आयुष्यात कधी ओरखडा सुद्धा न उठलेल्या शरीरावर एकदम बायपास. माझी एक बहिण नेहमी म्हणायची कि विश्रामचं म्हणजे सगळं उलटंच असतं. सब सोनारकी आणि एक लोहारकी. वा! ऑपरेशन असावं तर असं.  छाती कशी भरून आली. आता उद्या काय होणार? उद्याचं उद्या.